असे काही नाही की माणूस शालीन, विनयशील, प्रामानिक माणसाच्याच प्रेमात असतो. बऱ्याचदा अशा व्यक्तींचा सहवास आवडतो. ज्याला आपण प्रेम म्हणू शकतो. अशा व्यक्तीच्या स्वभावामुळे आपल्या भावनीक गरजा भागवल्या जातात. माणसाच्या मनाची मुख्य गरज प्रेम; क्वचितच प्रेमळ व्यक्तिच्या रागाला , तिरस्काराला सामोरे जावे लागते. अथांग सागरातील क्षणिक तुफाना सारखे; त्या अगोदर अन् नंतर प्रेमळ स्वभावाचा आनंद घेता येतो. निर्मळ प्रेम करायचे म्हणजे एखाद्याला भरभरून द्यायचे. सहाजिकच फसवणूक, अप्रामाणिकपणा या प्रेमाच्या विरुद्ध बाजू असतात. तर शालीनता, विनयशीलता, प्रामाणिकपणा, नम्रता हि प्रेमाची उपरुपे असतात.
प्रश्न असा आहे, अशा स्वभावाच्या माणसाच्या प्रेमात असल्याचा दावा करणारी माणसे विरुद्ध स्वभावाची का असतात? निसर्गाच्या नियमानुसार ऋण आणि धन एकमेकांकडे आकर्षित होतात हेच खरे. प्रेमळ माणसे व्यवहार प्रिय असतात. ते जे देतात त्या बदल्यात प्रेमाची आशा ठेवतात. त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद मिळाला नाही तर अशा व्यक्ती नात्यापासून दूर राहणे पसंद करतात. प्रेमळ स्वभाव हि माणसाची ताकद असते, कमजोरी नव्हे. उपभोग घेणारे उगाचच गैरसमजात असतात, कसे फसवले!
तुमच्या हजारो घावांना एकदा जरी प्रतिउत्तर दिले तरी तुम्ही उद्धवस्त होऊ शकता. या आंतरीक ताकदीला प्रेम म्हणतात.ज्याला माफ करण्याचे वरदान असते. म्हणून अशा व्यक्ती वंदनीय असतात.