सृजन

अश्वथाम्यासारखी एक भळभळणारी जखम माझ्या ही माथी आहे. युगान् युगे गेली तरी त्या जखमेसोबत जगणं अवघड वाटत आहे. एकांत वासात, अज्ञात वासात राहून मुक्तीचा मार्ग निवडावा. परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपण आता तयार आहोत असे ज्या क्षणी वाटते नेमका तोच क्षण असतो, माथ्यावरच्या भळभळणाऱ्या जखमेची अचानक एक खपली उडते. ठणक अशी उठते की रंध्रारंध्रापर्यंत यातनांची शृंखला तयार होते. हृदयात पोहचताच हृदय पाझरू लागते. मस्तिश्काकडून आज्ञा मिळते, पद्मासन मांडू नको. अजून थोडा अवकाश आहे. अजून यातना बरोबर परमार्थाला साधण्याचा या नश्वर इंद्रीयांना आभ्यास व्हायचा आहे. सहाजिकच या सृष्टीच्या चराचरा मध्ये फिरायला हवं,थोड जखमेसाठी तेल मागायला हवं. सृजनशीलतेचे वरदान आहे तर अमरत्वाचा शाप आहे. एक वेळ अश्वथामाला ही उशाप आहे. पण माझ काय अशी कित्येक महाभारते घडणार आहेत.ती फक्त माझ्यासाठी ; याचे मला भान आहे. माझी ताकद ही काही माझी नाही याची मला जाण आहे. पराधीनतेकडून मुक्तीकडे ही शुन्याकडे वाटचाल आहे.

जन्ममृत्यूच्या फेऱ्यात राहून जखमेला भाळी मिरवणे की शुन्याकडे जाऊन शुन्य होणे याचे मला अज्ञान आहे. हि माथ्यावरची जखम फक्त मलाच यातना देत आहे. तिचा दाह तेजस्वी लालबूंद आहे. पहाणाऱ्याला उगवत्या सूर्याच्या लालीमेचा आभास आहे. ती माझ्या भाळावरती नजरा खिळवून ठेवत आहे.माझ्या दिसण्यामध्ये असण्यामध्ये भवसागर आहे. मी कुडीत बंधिस्त असून कर्माच्या भोवऱ्यात मुक्ती स्थान शोधत आहे.मळलेल्या वाटेवरती मुक्ती साठी तरी कुठे वेळ आहे. तार्किक जगण्याचेही मला वावडे आहे. मी अपूर्ण संपूर्णच्या शोधात भटकत आहे. या वाटेवरच्या पथिकाकडून कोण कर्माची अवघड वळणे सुलभ करुन घेत आहे. मी अज्ञानी अनंताचा प्रवासी या पोषितांच्या सोबतीने मोक्ष मिळवणार आहे. त्या परे अनंत पाहणार आहे.

Leave a comment