ओळख

गाव मातीत घर,

विना पाटीच घर,

परिचित परिसरात वडिलांच्या नावान होतं।

विस्तारल्या शिवारात,

आक्रसल्या सुविधात,

एक सुप्त ध्येय जागत होत

उंच उंच स्वप्नांचं ,

चमचमत्या सुखांच,

एक शहर खुणावत होतं।

गंधाळल्या मातीचं,

सळसळता धुंद वायुचं ,

बेभान काहीच कुठे बांधत नव्हत।

एक वेड भिरभिरतं,

सुख चैन हरवतं,

लोंढ्यात लुप्त होऊ पहात होतं।

धडधडत्या यंत्रात,

गुदमरल्या धुक्यात,

नवं विश्व मुळ धरत होत।

मी, माझे,मला,

काही तरी गवसलं,

म्हणता म्हणता बेधुंद काही बिनसलं।

हळूहळू सार सुटलं,

घड्याळाने तारांबळल,

ओळख ओळखपत्राने ओळखत राहील।

पंचतारांकित खुराड्यात,

स्वैर मन शहरात,

धावताना उद्देश विसरत होतं।

साधी भोळी माणसं,

रसाळ, मधाळ वडीलमाणसं,

ओढ लागूनी सतत मन जाई गावात।

कधी वृक्षवल्ली सवंगडी,

गाढ झोपेत स्वप्नात गढी,

एक एकटाच ओळखीच्या शहरात।

फिरूनी शोधत मुळ गावात,

मी तसा अनोळखी गावात,

पडक्या भिंती मिरवती ओळख माझी गावात।

Leave a comment