हेर

निशाचर आम्ही, निशाचर आम्ही,

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

शशी नको आम्हास साथी

रवीची न आम्हास गोडी

जागण्यास रात्र थोडी

लटकणार आम्ही, भटकणारे आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

प्रकाशाचे शिलेदार निद्रिस्त

सावजाची निद्रा न भंगीस्त

आवाज दाबून भक्क्ष फस्त

स्वैर आम्ही, निर्भय आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

काळोख भेदे नजर तांत्रिक

काळरात्री विहार मांत्रिक

जग हे अचंबित यांत्रिक

मुसद्दी आम्ही, शिकारी आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

सत्याची आहे आम्हास चाड

प्रकाशाचा खेळ नजरेआड

काळी जादू भलतीच द्वाड

स्वराज्यात अनामिक आम्ही, अज्ञात आम्ही

रात्रीच्या कुशीत मांडणार खेळ आम्ही।

छत्रपतींची आम्हास शान

मातीची आम्हास आण

स्वराज्याची आम्हास तहाण

सह्यकड्याचे कातळ आम्ही,शत्रूचे काळ आम्ही

शिवबांचे बहिर्जी आम्ही, शिवबाचे बहिर्जी आम्ही।

Leave a comment