पिले

ज्ञानार्जन की अर्थार्जन ना कळले कधी,

रोजंदारी शिक्षणाची करताना मोठे झाले कधी,

पिले चालली दूरदेशी दाणापाणी शोधण्यासाठी,

आशा आकांक्षाना कर्तृत्वाने तोलण्यासाठी|

उबदार घरट्यात विसावली छायेखाली,

दडपून वास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली

स्वप्नांचे बळ पंखात उंच भरारी घेण्यासाठी,

आशा आकांक्षाना कर्तृत्वाने तोलण्यासाठी|

आशिर्वादाची शिदोरी आई-बाबा, गुरूजनांची,

घेऊन आठवण बालिश खट्याळ मैत्रीची,

पानावले डोळे का ? जड पाऊल उचलण्यासाठी,

आशा आकांक्षाना कर्तृत्वाने तोलण्यासाठी|

क्षणिक सैरभैर किंचित संभ्रम ना कुठे,

स्व-संघर्षात प्रबळ इच्छांना पहाट फुटे,

नव्या क्षितीजात जुने शाश्वत शोधण्यासाठी,

आशा आकांक्षाना कर्तृत्वाने तोलण्यासाठी|

नवरी!

गालाची लाली,हळद पिवळी,

सोन पाऊले सोनचाफा बहरली,

नव्या नात्याच्या मोहक सरी,

हि कान्हाची बासुरी, नवरी साजिरी|

हिरवा चुडा, हिरव्या शेल्याची गाठ,

चंद्रकळा पैठणी भरजरी काठ,

चंद्राची चांदणी झळके वेदीवरी,

हि कान्हाची बासुरी, नवरी साजिरी|

हि जराशी वेगळी, थोडीशी मानी,

अग्नीची साक्ष हळव्या क्षणांची गोडी

भिरभिर नजर नवखी धडधड उरी,

हि कान्हाची बासुरी, नवरी साजिरी|

आई-बाबांची परी, मनी भातुकली जरी,

ओलांडून जोडीने माप होईल मोठीं,

हात हातात गुंफून सुख दुःख सावरी,

हि कान्हाची बासुरी, नवरी साजिरी|

स्त्री-धन?

स्त्री समानता हक्क भेटला तू-ला,

नाही भेदाभेद सारखा अर्थ लाभला तू-ला|

जोखड तुटला,न्याय भेटला तू-ला,

बहुजना खटके हर्ष भेटता तू-ला|

भाऊबंदकी वहिवाट,नवी वाट, तू-ला,

बहिण-भाऊ नात्याचे गालबोट तू-ला|

आठवणीत माऊलीचा कंठ दाटतो तू-ला,

तुळस अंगणी पारिजात रुसला दिसला का तू-ला?

माहेरचा जिव्हाळा कधी कळावा तू-ला,

नको साडीचोळी हवा ओलावा तू-ला|

भावनांचा कल्लोळ कळेना व्यवहार तू-ला,

आत्मनिर्भर आत्मज्ञान मार्ग सोपा तू-ला|

जलधारा!

इवलासा झरा, इवलीशी धारा,

जन्म तूझा इवलासा खरा |

खळखळ हासत, नाचत, गुणगुणा,

खेळत, बागडत पर्वतांच्या अंगणा |

चपळ, चंचल, चितचोर , धुंद,

उफानलेल्या रुपात नजर बंद|

कधी नितळ, सोज्वळ, निर्मळ,

प्रतिबिंबित सृष्टी अन् आरस्पानी तळ|

नटली, सजली वनराई चौहीकडे,

तृप्त मन बहरली धरा इकडे|

कुठे वंदनीय, पुजनीय, जीवनदायी,

समर्पित जगणे तूझे वरदायी|

अवगुण, दुर्गुण, अपराध याचकात,

सामावले सारे तुझ्या उदरात|

नदी, जलधारा, सरिता नाव काही गंगा-यमुना,

दे दातृत्वाचा भाव अस्तंगत मानवा|