प्रवास

जन्माने जरी कंगाल

कर्माने धनवान असेल.

बंद जरी नसिबाची कवाडे

प्रयत्नात सूर्याचे तेज असेल.

जीवन जरी निर्जल मरूभूमी

अतिखोल जाण्याचे सामर्थ्य असेल.

घडविने जरी महाकठीण

ऐरणीचे सोसणे असेल.

चमकते सौंदर्य जरी जठिल

अग्नीतून निखरने असेल.

संकटे जरी वारंवार तुफाणी

मन अचल पर्वत असेल.

ध्येय जरी दूरचा तारा

जिद्द प्रकाशावर स्वार असेल.

यश तुष्टतेचे जरी शिखर

चित्त प्रवासावर असेल.

प्रवास जरी धैर्यशील

अंतत: मातीला मातीची जाण असेल.

हि भूमी

गंगा विसावे महादेवाच्या शिरी

यमुनेकाठी कान्हा क्रीडा करी

सरस्वती समाधिस्त धरेवरी

पवित्र पावन प्रकृती वैदेहि परी

सरहद्दीवर सातजणी साथ सिंदू धरी

समझोत्यावर संयमास प्रवृत्त करी

ब्रम्हपुत्रा, कृष्णा, गोदावरी कावेरी

तोडीस जलधारा प्रकटल्या गिरीशिखरी

घनी वनराई, धनधान्य, हरित किर्ती

हि भूमी अक्षय्य खजिना जतन करी

दयाळू कोटी कोटी जन उदर भरी

श्रदाळू कृषक दातृत्वाचा मान करी

नैऋत्य मौसमी वायु दक्षिण वरी

सुफळ, संपुर्ण , समृद्ध मातेस करी

शरदचंद्र

मालवूनी दिप सारे

आकाशीचा चंद्र पहा रे

शरदचंद्राचे रूप गोजिरे

संग पसरले अनंत हिरे

टिमटिमनारे तारे

नक्षत्ररेखांना भेटा रे

अगम्य हे छत वसुंधरे

शितल मधूर प्रकाश घ्या रे

विसरून कुडीचे भोग सारे

अनंताचे दर्शन घ्या रे

लेखणी

रक्तात नहाते

तळपत्या पात्याची धार

गर्जनेतला जोश सांगतो

मृत्यूला भिडन्यास सैन्य तैयार

जोशात एक घाव दोन तुकडे

करी मनगटातला जोर

जोर अन्यायाचा, सहनशीलतेचा

करी जन उद्दपीत क्रोध क्रुर

क्रोध विध्वंसक क्रोध संयमी

क्रोध संयमी सळसळत्या रक्तात धैर्य

रक्ताचा अभिषेक मातीला

मातीचा कण गातो बलिदानाचे शौर्य

बलिदानाच्या असंख्य कहाण्या

सजीव करी स्वतंत्र लेखणी खरी

प्रक्षोभक लेखणीचा प्रहार प्रचंड प्रबळ

उलटवून टाकतो हुकूमती तक्त खुंखारी

हुकूमती तक्त गर होई सत्तांध

जनजागवी लेखणी बहूपराक्रमी नूर

स्वायत्त निर्भय निर्भीड सुंभ

लोकशाहीचा लोकक्षोभ जागृत सूर

विजयी वेळ

भरुन येते ते आभाळ,

मोकळे असते ते आकाश,

नजरेचा धोका की मनाचा खेळ,

कोणाला सोस, कोणाला जोश।

अनाकलनीय शक्तीची विकारी खेळी,

दृश्य-अदृश्य अकार, उकार,मकार,

देव माणसी, देव राऊळी,

कोणाला भेटे कर्मात, कोणाला धर्मात।

अतीचा होय निसार घटका अघटित ,

फुलपाखरू फसे काटेबाभूळी फेसात,

मुक्त दैव सोडी, दैव तोडी,

कोणाला संचार,कोणाला बंद श्वास।

दया भाव कमी की अन्यायाला बळी,

नकाब न झाकी दुष्टांचे हसू छद्मी,

वेळ मातब्बर, वेळ ओंगळ,

कोणाला शरम भीड, कोणाला निर्भिड ,

धाडसाचे मोल असे खडतर आव्हान,

प्रयत्नात दिसे परमोच्च भाव,

संघर्षांस सिद्ध , संघर्ष अटळ,

ऋतू बदल, विजयी वेळ।

मैत्री

निर्मळ, सोज्वळ, निखळ, निरागस असते

मैत्री।

राग, अडी, कट्टी-बट्टी ,रंग-बिरंगी असते

मैत्री।

अस्वस्थ जीवांचा संथ विरंगुळा असते

मैत्री।

साथ असताना हास्याचा खळखळाट असते

मैत्री।

दूर असताना अस्तित्व विनम्र जपते

मैत्री।

गरजेने हात गुंपणे नकळत दिर्घ गुंतते

मैत्री।

अश्रुंना गर्तेत एकाकी खांदा असते

मैत्री।

मित्राचे अनोखे चारित्र्य जाणून राहते

मैत्री।

अनिर्बंध उ्च्छास कृष्ण- सुदामा असते

मैत्री।

आषाढ धारा

अंधार सारा, तुफानी वारा,

गगन मारा, आषाढी धारा,

भानू हरपला अंबरी,

असा थैमान घालतो ऋतू पाऊस भूवरी॥

डबक्यात साची, ओघळ वाहती,

रस्त्यात पाणी,वाट हरवती,

वळचणीच्या धारा माजघरी नांदती,

असा थैमान घालतो ऋतू पाऊस भूवरी॥

फेसाळ लाटा, सागर सरिता,

कोसळती कडा,दुधाळ धारा,

पशुपक्षी शोधती ओसरी,

असा थैमान घालतो ऋतू पाऊस भूवरी॥

विस्तापित गावे,मोडती घरे,

कष्टातीत जगणे, दुर्बल राहणे ,

जलमय सृष्टी धोस दाखवी,

असा थैमान घालतो ऋतू पाऊस भूवरी॥

जग सुंदर झालं !

निळं भोर आकाश,

स्वच्छ होता प्रकाश,

लाटांवर स्वार होत मन हेलकावतं

जेव्हा लोटली होती मी माझी होडी सागरात॥

स्वप्नांचा गाव दूर होता,

मनात तर अगदीच जवळ होता,

मन केंव्हाच पैलतीरावर पोहचल होतं,

जाई-जूई, मोगऱ्यासवे हिंदोळ्यावर हिंदोळत होतं॥

कळलंच नाही काय झालं?

अचानक कसं अंधारुन आलं,

हाऽ हाऽ म्हणता वादळ वार शिडात घुसलं,

उंच उंच लाटांच्या तडाख्यात अस्तित्व हेलकावलं

होडी झाली उध्वस्त ,

उरलं ओंडक्यावर जीवित्व,

हे वादळाचं येणं किती सुंदर झाल!

भयावह वाटेवर प्रेम करायला शिकवून गेलं॥

स्वप्नातल गाव राहून गेलं,

खडतर रस्त्याविना जगणं अवघड झालं,

अनोळखी किणाऱ्यावर उतरणं झालं,

मृत्यूवर मात करुन जग सुंदर झालं॥

आई

ह्रदयात आई तुझ्या घर माझे कैद आहे,

आठवणींचा एक दोर अजूनी पायात बंद आहे,

एकांती मग्न भासात कानी तुझी साद आहे,

प्रतिबिंबिंत स्मृतीगंधात आसक्त मोद आहे

ब्रम्हांडी तेजात उत्क्रांतीचे बंड आहे,

दैत्येश्वरी आई तुझ्यापुढे विद्रोही थंड आहे,

कजाग बालकास निरंतर संकट आहे,

तपस्विनी तप तुझे साहुनी तुष्ट आहे।

भूगर्भात दाहक उत्पतीचे गुढ आहे,

कल्याणी जननी जगाधारा कृती अखंड आहे,

भूवरी आई तू शितल शामल स्वर्ग आहे,

कैवल्याचे शिंपणे इथे जीवन माझे सार्थ आहे।

हिंदोळा

भिर भिर भटकती शोधत जिव्हाळा रे,

खळकन् होतो ठिकऱ्या छिन्न ह्रदयाचा कोपरा रे,

विवेकाने गुंतव भरवशाचे सूत रे,

सावर रे, हिंदोळा भावनांचा सावर रे।

घन घन घाव घालती प्रतिसादात रे,

अनोळखी गर्दीत हरवती सगे सोयरे रे,

शिक आपसूक हासणे आश्रुंना झाकने रे,

सावर रे, हिंदोळा भावनांचा सावर रे।

हि वाट काळोखी किर्रर्र वनातली रे,

काजव्यांनच्या उजेडावर नको विसंबू रे,

आत्मप्रकाशाने उजळ पावलांची दिशा रे,

सावर रे , हिंदोळा भावनांचा सावर रे।

घटपर्णीचा मध मधुर मोहक रे,

मोह डुंबायाचा असे श्वास अखेरचा रे,

श्वासाहून मोठा असे ध्यास रे,

सावर रे, हिंदोळा भावनांचा सावर रे।

मातीतून जन्म तुझा मातीचा रे,

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सोसणे धर्म रे,

कर्मात असे धर्माचे इमान रे,

सावर रे, हिंदोळा भावनांचा सावर रे।

उन्हाळयात मातीला बिलगून रहा रे,

पालटून ऋतू फळाफुलांचा बहार रे,

धुंद श्रावणाच्या ओल्या ऋतूत दंग रहा रे,

सावर रे,हिंदोळा भावनांचा सावर रे।

झेप घेण्याचे सामर्थ्य असे जिद्दीत रे,

इवल्याशा कवेत सामावे कल्पनेतील आकाश रे,

हिंदोळ रे

नीत्त हर्षाच्या वायूवर हिंदोळ रे।