आई

गर्दीत घट्ट धरला होता पदर तुझा,

मागे वळणाऱ्या नजरेत होता विश्वास माझा,

न सांगताच जाणलेस मन माझे,

व्यापलेस अवघे बालपण माझे,

दूरावा हूरहूर लावत असे जीवा,

भरल्या घरात जळतो एकटाच दिवा,

कर माझे रिकामे काही देण्यास,

मग का जुळतात आशिष घेण्यास ?

आईला हे करायचं असतं!

मुलगी झाली, इतरांच माहित नसतं,

आईचं मन आनंदाने उधाणलेल असतं,

तिचं बालपण परतून तिच्या मांडीवर असतं,

स्वत:च राहून गेलेलं भरभरून जगायचं असतं,

भातुकलीचा खेळ परत मांडलेला पाहायचं असतं,

छूम छूम आवाजाला कानात साठवायचं असतं,

एक सौंदर्य हळूहळू उमलताना पाहायचं असतं,

काळजीनं काळवंडायचं असतं,

फूलासारखं जपायचं असतं,

दुसऱ्याला द्यायचं असतं,

तरी भरभरून प्रेम करायचं असतं,

संस्कारांच दान द्यायचं असतं,

कर्तव्याच ओझं लादायचं असतं,

वसा पुढं न्यायला शिकवायचं असतं,

सर्वांना खुशाल ठेवायचं असतं,

मन कसं मारायचं हे दाखवायचं असतं,

दोन घरांची इज्जत बनवून पाठवायचं असतं,

एका एका अलंकाराच्या बेडीने सजवायचं असतं,

नातं निभावयला शिकवायचं असतं,

लेकीच माहेर बनून सासरी नांदायच असतं.

संघर्ष!

कित्येक आले, कित्येक गेले,

जातीसाठी माती खाणारे,

जात-धर्म भेदाभेद संपवणारे,

जात सोडून समानता आणणारे,

जाती विरहित समाजाचे स्वप्न पाहाणारे,

जातीला मातीत घालण्यासाठी पेटून उठणारे,

जातीला मूठमाती देऊन शांतता प्रतिष्ठीत करणारे,

जागे होऊन साक्षरतेच्या निष्कर्षाला जाणारे,

समानतेवरती घटनेचा पाया उभारणारे,

जात हि अशी सर्वांना हारवून जिंकणारी,

राजकारणात विजयाचा शिरेटोप घालणारी,

गरिब- श्रीमंतीचा भेद जाणणारी,

स्वातंत्र्यांत हि हक्काचा संघर्ष घडवणारी,

जात ती जी कधीच जात नसते,

धर्म तो जो दुसऱ्याचा कधीच श्रेष्ठ नसतो,

गुपित यामागे लपले गरिब-श्रीमंतीचे,

खेळ खेळतात जाती-धर्माचा प्रतिक बुद्धिमतेचे.

खेळिया!

दोन घडीचा डाव आहे.

तुझ्याचसाठी हा सारीपाट आहे.

तू खेळ तुझा डाव.

डावपेच खेळूनी दाव.

तो तुझा अधिकार आहे.

तुझ्या चातुर्यावर माझा विश्वास आहे.

तू खिलाडी डाव तुझा आहे.

अंतिम निकाल माझाच आहे.

मी आधुनिक.

मी आधुनिक, मी आधुनिक,

नव्या नव्या गोष्टींकडे मन माझे धावते आहे,

पैंजण, साखळ्या,नथ, कंगन,बिंदी अडगळीत टाकले आहे|

जीन्स,टाॅप सलवार,कुर्ती डिझाईन मध्ये हरवते आहे,

विविधतेच्या वेडापायी कपाट कोंबून कोंबून भरते आहे|

जूने सगळे आऊट-डेटेड मानते आहे,

नविन खरेदीसाठी बाजारात धावते आहे|

नविन काही शोधता शोधता नजरेस काही पडते आहे,

नजर माझी त्याच्यावरच खिळते आहे|

विसरून सगळं त्याचा प्राईस-टॅग हळूच पाहते आहे,

ओव्हर बजेट असूनही पाय माझा खेचते आहे|

बजेट सारे गुंडाळून त्याची मालकीन मी बनते आहे,

परंपरागत साडी मध्ये कशी दिसेन मनात पाहते आहे|

भरजरी काठ, मऊ रेशमी परिधान करायला मी आतूर आहे,

रंग माझा खुलतो का?परत,परत आरशात पहाते आहे|

काही तरी कमी आहे, हा आरसाच मला सांगतो आहे,

पैंजण, साखळ्या, नथ, कंगन,बिंदी घरभर शोधते आहे|

मी मला परिपूर्ण दिसते आहे,

रेशमी साडी मधले भारतीय सौंदर्य मला वेडावते आहे|

जगायचं असतं!

कोणी कोणाचं नसतं

एकटच जन्माला यायचं असतं,

अन् एकटच मरायच असतं,

या अंतरामध्ये आयुष्य जगायचं असतं|

रिमझिम पावसात भिजायचं असतं,

कडकडत्या वीजांना घाबरायच असतं,

शुभ्र बर्फामध्ये मस्त खेळायच असतं,

विराण वाळवंटामध्ये चालायचं असतं|

समुद्राला डोळ्यात साठवायचं असतं

उंच आकाशात विहंगासम विहारायचं असतं

पाऊल खुणा शोधत भटकायचं असतं,

भविष्याच्या वेगात मिसळायचं असतं|

सौंदर्यांचा गर्व करुन पाहायचं असतं,

गुणांचा अभिमान बाळगून राहायचं असतं,

चुकांमधून काही शिकायचं असतं,

नविन चुका करत राहायचं असतं|

कोणावरती तरी विश्वास ठेवून पाहायचं असतं,

विश्वास सिद्ध झाला म्हणून आनंदात वाहायचं असतं,

विश्वास घात झाला म्हणून हळहळत रडायचं असतं,

मैत्रीचं, प्रेमाचं नातं जपून पाहायचं असतं|

भेटीगाठी मध्ये खळखळून हसायचं असतं,

नात्यामध्ये थोडं फसवून घ्यायचं असतं,

अतिरेक झाला तर जमिनीवर न्यायचं असतं,

थोडा गर्व करुन पाहायचं असतं|

स्वप्नांमागे धावत राहायचं असतं,

हारलो तर संपून जायचं नसतं,

‘मी’च का? म्हणून रडायचं नसतं,

संकटांना संधी समजायचं असतं|

सुख-दु:ख, हार-जीत अनुभवायचं असतं,

वाहणारं जीवन जगायचं असतं,

जन्मापूर्वी, जन्मांनंतर अनंतातच राहायचं असतं,

जन्मा बरोबर काही करायचं असतं,

जगायचं असतं|