पाऊस धारा..!

रात्र न् दिवस धुव्वांधार बरसतो आहेस,

असा असमंजस चिंबचिंब भिजवतो आहेस,

रौद्र तू पालापाचोळा घाण वाहतो आहेस,

सोनेरी प्रकाशात नवे रूप पाहतो आहेस,

बरस असाच दुरावलेल्या मनात,

सुंदर सुरेख आठवणीं उमटतील क्षणा क्षणात,

गैरसमजाची जळमटे वाहतील झंझावातात,

फुलतील मोहक रंग नात्यांचे नव्या रुपात.

साने गुरुजी…. (एक प्रभाव,आजचा अभाव!)

‘साने गुरुजी’ नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते, ‘श्यामची आई ‘ पुस्तक किंवा चित्रपट . यातील निरागस,प्रेमळ ,कवी मनाचा शाम व त्याची सहज सुंदर आई. ‘ श्यामची आई’ ने एका पिढीवर संस्कार केले असे म्हण्टले तर अतिश्योक्ती होणार नाही.आज हि संवेदनशील मनाच्या व्यक्तीला ‘श्यामची आई’भावते. व आजच्या शालेय जीवनात याचा अभाव जाणवतो. ते ती कोणत्या माध्यमाची शिक्षण संस्था आहे या मुळे नाही तर मराठी जी आपली बोली भाषा आहे तिचा दर्जा म्हणावा तसा मुलांच्या वया बरोबर न वाढत जाणे हे होय. मग साने गुरुजींच्या साहित्याने पिढीवर संस्कार केले म्हणजे काय?

शाम बरोबर पाहिली ओळख म्हणजे, पाठ्यपुस्तकातील एका धड्यात भेटलेला शाम. तो इतका प्रभावी असतो की त्याच्या सारखं आपण ही व्हावं असं मनात येत. त्याच्या वेडापायी ‘श्यामची आई’ पुस्तक घरामध्ये येत. हातात येताच त्याचा फडशा पाडला जातो. इथे त्या बालवयात दोन गोष्टी घडतात, एक वाचण्याची आवड निर्माण होते तर दुसरा संस्कार होतो तो इतरांना समजून घेण्याचा . मोठं होता होता अजून एकदा त्या कोमल मनाच्या लेखकाशी आपला सामना होतो. तो पाठ असतो ‘ कुमारांपुढिल कार्य’ तसं पाहिलं तर ते एक भाषण होते. जे संस्कार घडवण्यासाठी पाठ स्वरुपात देण्यात आले होते. खरच थक्क करणारे, उठून उद्या पासून ते सांगतात त्या कामाला लागल पाहिजे अशी उर्मी निर्माण करणारं . कणखर, कठोर, दृढ निश्र्चयी समाजसुधारकाला भरभरून अनुभवता येणार. आणि जिद्द चालू होते सानेगुरुजींना समजण्याची, जसं जसा त्यांच्या लिखाणातून त्यांच्या कार्याशी परिचय होत जातो, तसं तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढत जाते. त्यांच मुलांवरील प्रेम, त्यांनी गांधीजींच्या विचारांचा घेतलेला ध्यास,त्यांचा त्याग सगळंच अविश्वसनीय, अचंबित करणारं. ‘फक्त समाजासाठी जीवन व्यतीत करणारा माणूस असू शकतो,’ खास करून दिसणं अगदी सामान्य व कोणाला हि एका नजरेत प्रभावित न करणारं असताना. जे समकालीन लेखकांच्या लिखाणातून समजते.इथे कसल्याहि स्वार्थाचा स्पर्श न झालेला एक वेगळाच शाम आपल्याला भेटतो.

स्वातंत्र्याच्या स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण देश एक झाला. अनेकांनी आपले विचार बाजूला ठेवून गांधीजींच्या मार्गावर जाणे मान्य केले. हि एकता नियतिने घडविली की त्या अवलियाने माहित नाही. पण त्या विचारांना सानेगुरुजीं सारख्या व्यक्तिने प्रत्यक्ष जगण्यात उतरवले.एक एक शब्द आचरणात आणला. गांधीजींची चळवळ महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी गुरुजींनी आपल्या वकृत्व कौशल्याने व अविश्रांत सभांनी रानं उठवले.ते जसे बोलत होते प्रत्यक्षात कृती करत होते. हे त्यांच्या बद्दल इतरांनी केलेल्या लिखाणातून समजते.एका विरळ संताचे दर्शन घडते. एक साधा भोळा माणूस, एक विचारवंत, एक प्रगल्भ नेता, एक समाजसुधारक की एक शिक्षक प्रत्येक रुप त्या त्या भूमिकेत संस्कार घडवतात. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ हे आजमावण्यासाठी शालेय जीवनात अशा व्यक्तींच्या विचारांबरोबर चालायला मिळाले पाहिजे.

त्यांना अभिवादन करताना गंगाधर जोगळेकर किती मार्मिक लिहतात,.

“सह्यगिरी परि कणखर होता तुमचा निश्र्चय

महोदधिपरि विशाल तुमचा सद्गुण संचय.

शततीर्थाहूनि पावन होती तुमची वाणी.

स्वतंत्रतेची स्तोत्रे झाली तुमची गाणी..,..”

आयुष्या !

सांग, काय बोलू तुझ्या बरोबर?

ऋतू येतो, ऋतू जातो रोज तर भेटतो आपण,

बघं, तुझ्याचसाठी मी मला कोंडले, आहे ना खरं,

आयुष्या, तूच – तू, अन् मीच -मी म्हणजे आपण|

बेभान मन, अनवाणी पाय, धुंद स्वप्न बरोबर

पंखाखाली मायेच्या होतो गुजगोष्टी ऐकत आपण

निजलो गाव कुशीत रान – डोंगराच्या अंगाई बरोबर,

आयुष्या, नव्हतो तूच -तू अन् मीच-मी म्हणजे आपण|

धावताना स्वप्नांच्या मागे नव्हते ठाऊक जगलो सत्य सुखा बरोबर,

सैल झाले बंध, गेले तुटून संबंध कधी कसे आपले आपण

मऊ मातीची, दाट सायीची नाती जिव्हाळ्याची निखळ पाण्या बरोबर,

चल आयुष्या, शोधू त्यानां तूच-तू अन् मीच-मी म्हणजे आपण|

सत्य अंतीम एकच आहे जगा बरोबर,

विसरून ‘मी’ला, जुळवू ऋणानुबंध आपले आपण,

सचेतन चेतनांना सांग आहे काळ मृत्यू शय्येवर,

आयुष्या बरोबर सगळे तूच-तू अन् मीच-मी म्हणजे आपण|

मनस्वी