
विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठलाऽऽ


आव्हानांना तू देत रहा|
मला असेच पेटवत रहा|
चिंगारीला हवा देत रहा|
दु:खाला सतत पाठवत रहा|
तप्त उन्हाळे देत रहा|
अपघातांना भिडवत रहा|
एकटे सोडून पहात रहा|
माझे मला भेटवत रहा|
मला लढवय्या बनवत रहा|
विजय माझा पहात रहा|
तू देणारा देत रहा|
माझ्यात अंश पहात रहा|

आयुष्य भेटले सरळ रेषेत,
अनोखे, अमर्याद, अनंत|
स्वार्थाने तोडले, मोडले, वाकविले,
कोण, काटकोन, त्रिकोण, वर्तुळात|
भौमितिक रचनेत बंदिस्त केले,
अस्तित्व अवघे बंदीवान झाले|
मग दु:ख गालावर ओघळले,
सामर्थ्य विझण्याचे कारण झाले|
महाभयंकर, प्रलयंकारी घाव सोसले,
परि सृष्टीचे कधी चक्र न थांबले|
स्वातंत्र्याचे रडगाणे झाले,
जे सृष्टीने श्वासासवे अर्पिले|
बुद्धीने गर्विष्ठ झाले,
विचारांचे गुलाम सारे|

कळलेच नाही, कोण, कधी, कुठे असे कसे शिकवून गेले,
बाबांवर पाठीमागे रुसायचे|
समोरुन काही नाही बोलायचे,
नाही भांडायचे,
नाही ओरडायचे,
नाही काही मागायचे|
हवे नको आईकडून सांगायचे,
तिच्या जवळ पाय आपटायचे,
बाबांना रागवायचे,
गाल फुगवून तिलाच दाखवायचे|
ओळखून आहे बाबा आदराची जागा,
कमजोर भावना,
विश्वास दांडगा,
उंच उंच पतंगाचा धागा|
उमजून जाई अडचणीच्या जागा,
चलबिचल त्रागा,
कर्तव्यातील बाधा,
वानप्रस्थातील धर्मा|


सुंदर झालं वादळाचं येणं,
तीचं ते अन्यायाविरुद्ध पेटून उठणं,
आपल्यातील परकेपणा जाणणं,
भ्रमाच्या प्रतिमेचे तुकडे होणं,
ऋणानुबंधाचे मोती समजणं,
पहाटेचे ते दवबिंदू असणं,
आता अंधार हटेलं,
आसवांची बरसात संपेल,
रुपेरी प्रकाश दाटेल,
गुंतलेला श्वास सुटेल,
ओंजळीत इंद्रधनु घेईल,
ती पुन्हा तिला भेटेल.


सावरुन कितीदा जवळ यावे,
पुन्हा पुन्हा विश्वासाने पहावे|
आभासी भास नात्यात शोधावे,
गोड कटु सत्यास मानावे|
हळूवार तरंगास गोंजरावे,
विसरून सारे घात आघात जावे|
आपल्याच गुंत्यात असे गुंतावे,
धागा धागा जाळ्यात कैद व्हावे|
जातीची जात असे मानावे,
डंकास घाबरून केवड्यास न मुकावे|
लपेटलेल्या चंदनास विष कसे चढावे?
फुलांनसवे काटे ही हसावे|
आपल्या गतीने आपण चालावे,
सूर्य ताऱ्यांतून प्रकाश शोषावे|
इंद्रधनु रंग आयुष्यात भरावे,
पुन्हा तुटन्यास पुन्हा भिडावे|
दवबिंदूचे मोती असे पिरावे,
कल्पनेत सौख्याचे चित्र रंगावे|
गतीला अगतीक न मानावे,
जीवन गाणे सुमधुरम व्हावे|


नको खंत अशी करु,
नको जीवा घरघर लावू,
हा क्षण शेवटचाच आहे,
उद्या हस्याचा मळा फुलणार आहे|
गल्ली क्रिकेट खेळता,
तावदान खळकन फुटता,
कानी शिवीगाळ घुमणार आहे,
उद्या हस्याचा मळा फुलणार आहे|
भोवरा गुणगुणतो भोवती,
लपून छपून प्रेमी प्रेम करती,
जळणारा चुगली करणार आहे,
उद्या हस्याचा मळा फुलणार आहे|
किटी पार्टीचे दिवस कुठे दूर,
सखे तुझा असूयेचा नूर,
नवरा, सासूचे गॉसिप जमणार आहे,
उद्या हस्याचा मळा फुलणार आहे|
कट्ट्याची मैफिल भारदार,
चहा सोबत डाव रंगणार,
राजकारण हमरीतुमरीवर आहे,
उद्या हस्याचा मळा फुलणार आहे|

