मन माझे…!

मन माझे श्रावणात भिजलेले,कण कण मोहरलेले,

हिरव्या हिरव्या नवलाईने नटलेले|

मन माझे शरद पुनवेच्या चांदण्यात नहालेले, देहभान विसरलेले,

गुढ रात्रीत स्वप्नाचे गाव पाहिलेले |

मन माझे शिशीरात क्षणभर गोठलेले, भावना थिजलेले,

बेभान वाऱ्यावर पतंगासवे डौलात डौललेले |

मन माझे वसंताच्या रंगांने बहरलेले,गंधाने गंधाळलेले,

हिरव्या पानातील कोकिळेत गुंतलेले |

मन माझे घन ग्रीष्माच्या झळा सोसलेले,धगीत तावलेले,

डोळ्यात वळिव धारांनी हळूहळू निर्ढावलेले |

मन माझे भक्ती रंगात बेधुंद भिजलेले, संसारास उबगलेले,

कुठे विठाई, कुठे कृष्ण-कान्हा, कुठे व्यंकटेश-शाम रुपात एकरुपलेले |.

Manaswi S.

सुंदर एकांतात……

‘एकटेपणा’ भीती दाखवणारा शब्द, गजबजाटातून एकांतात आलेल्यांना तर तो कारागृहा सारखा वाटतो.जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर या एकांतवासाला हि एक भाषा असते,जी शांततेने व्यापलेली असते.मन शांत स्थिर संवेदनशील बनवते… सौंदर्यांची अनुभूती निरामय आनंद देते…. प्रत्येक गोष्टीत किती आल्हाद भरुन राहिला आहे. याला मन हळूवार स्पर्श करते. प्रेक्षणीय स्थळांवरती पर्यटकांच्या गर्दीमध्ये गोंगाटात सुर्यास्त बरेच जण अनुभवतात पण कोणी आपल्या घरांच्या छतावर एकटे बसुन,एकटक सुर्य पश्चिमेकडे झुकू लागल्यापासून आकाशातील रंगपंचमी अनुभवली आहे का? निळ्या रंगात हळूहळू लाल , पिवळा, केशरी, भगवा, सोनेरी रंग चित्रकाराच्या फटकारऱ्या सारखे भरत जातात.सुर्य डोंगरावरती म्हणजेच क्षितीजावरती पोहचता पोहचता हे रंग अधिकच गडद होतात. एकांतात, शांततेत एकटक नजरेला भान हरपून तल्लीन व्हायला भाग पाडतात. जसा सुर्य पश्चिमेकडे जाईल तसा पूर्वेचा नीळा रंग करडेपणा धारण करतो. क्षितिज ते आपण नजरेच्या टप्प्यात येणारी झाडे, घरे, इमारती जी दिवसाच्या प्रकाशात स्वत: च्या रंगात वेगळेपणा मिरवतात आता सावलीच्या रुपात फक्त आकार धारण करतात. जणू दिवसभर पुढे मागे फिरणाऱ्या सावलीने त्यांनाच गिळंकृत केलंय….

एकांतवासावरती शांततेच अधिराज्य असते. भित्र्यामनाला अक्राळविक्राळ, भयंकर रौद्र रूप दाखवते तर संवेदनशील मनाला निसर्गाशी अद्भुत गुज करवते. दगडी चिऱ्यांच्या गाभाऱ्यात,भर दुपारी… मानसांच्या गर्दी पासून दूर…. एखाद्या टेकडीवर किंवा घनदाट जंगलात…. एकांतात असलेल्या मंदिरात प्रवेश करताच गाभाऱ्यातील गारवा मनाला ही थंडगार करतो. पायांना झालेला थंड स्पर्श मनाला ही आपल्या कवेत घेत सर्व चेतनांपर्यत पोहचतो आणि समोरची प्रसन्न मूर्ती …..श्रद्धेने नतमस्तक होण्यास भाग पाडते. घंटानाद करा, नाही तर स्वत:चा प्रतिध्वनी ऐका, गाभारा व्यापून टाकतात. मूर्तीतला देव सापडेल कि नाही हा श्रद्धेचा भाग आहे पण स्वत: मधला माणूस नक्की सापडेल,….

जेव्हा मन उद्विघ्न होते. सगळे मार्ग धूसर होतात आणि संकटांनी आपल्या वर मात केली आहे याची जाणीव होते. अशा वेळी काही क्षण एकांतवासाला बहाल केले तर,,, हा एकांतवास नवी उमेद, नवी ताकद देऊन अनेक कवाडे खुली करेल. निर्मनुष्य सागरी किनारा …विस्तिर्ण गुलाबी रेतीत अधेमधे झिजून ओबडधोबड झालेले खडक, समुद्रापासून सुरक्षित अंतर ठेवून वाऱ्यावर झोकांड्या घेणारे माड आणि समोर अथांग जलाशय…. क्षितिजावर एक पुसटशी रेषा निळ्या सागराला निळ्या आकाशा पासून दूर ठेवते. या एकांताला चिरतो फक्त रों रों करणारा समुद्र. त्या मुलायम रेतीत असंख्य समुद्री जीवांच्या हालचाली…शंख शिंपल्याची विविधता निरखत तासनतास व्यतित केले तरी मन भरत नाही. हा अद्वितीय अनुभव एखाद्या चित्रा सारखा परत परत स्मृती पटलावर झळकत असतो. या एकांतात व्यतित केलेला एक एक क्षण आठवणींचा खजिना सम्रृद्ध करत असतो. जर कधी अपरिहार्य कारणास्तव किंवा आयुष्याच्या संध्याकाळी चार भिंतीत कैद व्हावे लागले तर हे क्षण असे झळकतील कि तीच ती शांततेची अनुभूती मन तृप्त करेल.

स्त्री

परि जाहले अनंत प्रयास माझ्या अंतासाठी,
जन्मले सृजनशीलतेचा. नवचैतन्याचा वारसा घेऊन मी,
सुरूवात मी,अंतही मी, तरीही नकोशी अनेकांसाठी,
चिवट मी,कणखर मी, गर्भातही परिपूर्ण मी!

आई!

आठवणीत मोगऱ्याचा सुगंध,
आठवणीत पहिल्या पावसातील मातीचा गंध,


ओढ तुझ्या प्रेमाची होते नकळत मंद,
वाढता वाढता त्याग केला कर्तव्यात बंद,

सुख-दु:ख सारे प्रपंचास बाद्य

रुप, गुण सामावले तुझा माझा एकच छंद,
ठेवता पाऊल तुझ्या पावलावर आई स्वच्छंद,
जागल्या सर्व जाणीवा होऊन माझा आनंद,

झोळीत माझ्या तुझ्या अबोल प्रेमाची शिदोरी, बळ दे वाहू दे माझ्या पाखरांवरी|